मुंबई - राज्यात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) नववी ते बारावीपर्यंच्या शाळा आणि त्यांच्या वर्गांना सुरूवात झाली. तर शिक्षण विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार ३५ जिल्ह्यांच्या मिळालेल्या माहितीवरून २५ हजार ८६६ शाळांपैकी नऊ हजार १२७ शाळा सोमवारपासून सुरु झाल्या. अमरावती जिल्ह्याचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शाळांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी शिक्षकांनीच दांडी मारल्याचेही शाळेच्या पहिल्या दिवशी समोर आले आहे.
शालेय शिक्षण विभागाने सोमवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार राज्यात केवळ ३५ टक्केच शाळा सुरू झाल्या असून जळगाव, ठाणे, धुळे, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, मुंबई आणि हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याकडील शाळा सुरू करणार नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे या जिल्ह्यांमध्येही एकही शाळा शाळा सुरू होऊ शकली नाही. तर दुसरीकडे राज्यात सर्वात जास्त अमरावती जिल्ह्यात १०० टक्के शाळा सुरू झाल्या होत्या. तर सर्वात कमी शाळा वर्धा जिल्ह्यात केवळ १४ टक्के इतक्या शाळा सुरू झाल्या आहे. तर अमरावतीनंतर गडचिरोली जिल्ह्यात ९२.२ टक्के, उस्मानाबाद - ९०.६ टक्के, सातारा - ८९.२ टक्के, सोलापूर - ८६.५ टक्के, यवतमाळ - ८३.७ टक्के शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
या जिल्ह्यात सर्वात कमी शाळा झाल्या सुरू
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये रायगड, सिंधुदूर्ग, वाशीम, बीड, कोल्हापर, अहमदनगर, पुणे, वर्धा आदी जिल्ह्यात ३५ ते १४ टक्केच्या दरम्यान शाळा सुरू झाल्या असून उपस्थितीही केवळ ६ ते १ टक्के या दरम्यान राहिली आहे. वर्धा जिल्ह्यात तर एकुण विद्यार्थ्यांची संख्या ही ७० हजारांहून अधिक असताना आज पहिल्या दिवशीच्या शाळेत केवळ १.३ टक्केच विद्यार्थी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यात शाळा या शंभर टक्के सुरू झाल्या असल्या तरी येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये पाठ फिरवली असून केवळ ०.८ टक्के विद्यार्थी उपस्थित हेाते. तर अनेक ठिकाणी शिक्षकांनीही दांडी मारल्याचे दिसून आले.
असे आहेत, कोरोनाचे अहवाल-
राज्यातील दोन लाख ७५ हजार ४७० शिक्षकांपैकी एक लाख ४१ हजार ७२० शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली असून यापैकी १३५३ शिक्षकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर ४४ हजार ३१३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी २९० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सर्वात कमी चाचण्या या पालघर जिल्ह्यात झाल्या असून केवळ ४.२ टक्के शिक्षकांनीच कोरोना चाचणी केली आहे. तर ठाणे जिल्ह्यात ८.४ टक्के शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुणे २४.१ टक्के, अमरावती २५.६ टक्के, तर सातारा जिल्ह्यात १०० टक्के शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात २१२ शिक्षक, तर १४ शिक्षकेतर कर्मचारी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात ९२ शिक्षक आणि २२ शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
हेही वाचा - कंगना रणौत कार्यालय तोडक कारवाई : मुंबई उच्च न्यायालय 27 नोव्हेंबरला देणार निकाल