मुंबई - मुंबईच्या काळबादेवी येथील म्हाडाच्या सेस इमारतीचा भाग काल रात्रीच्या सुमारास कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका 61 वर्षीय व्यक्तीचा जे जे रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असता त्याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही इमारत पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
इमारत केली रिक्त -
मुंबईच्या काळबादेवी परिसरात म्हाडाच्या जुन्या झालेल्या सेस इमारती मोठ्या संख्येने आहेत. काल (रविवारी) रात्री साडे दहाच्या सुमारास खंडेराववाडी, बिल्डिंग नंबर 5, दादी सेठ अग्यारी लेन येथील एका इमारतीचा तळ अधिक चार मजली भाग कोसळला. त्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहचून अग्निशमन दलाने कोसळलेल्या व बाजूच्या इमारतीमधील सुमारे 100 रहिवशाना बाहेर काढून इमारत रिक्त केली.
व्यक्तीचा मृत्यू -
अग्निशमन दलाने इमारत रिक्त करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व बेपत्ता लोकांचा शोध घेतला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढून उपचारासाठी जे जे रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र त्या व्यक्तीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉ. अमजद शेख यांनी दिली आहे. सुंदरा सॉ असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो 61 वर्षाचा आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
हेही वाचा - सुसाट दुचाकींच्या धडकेत बाप-लेकांचा जागीच मृत्यू, एक गंभीर