मुंबई - कुर्ला पश्चिम येथील राम मनोहर लोहिया मार्गावरील एक घर (House Collapse at Kurla) आज दुपारी अचानक कोसळले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
घटनेत एकाचा मृत्यू -
कुर्ला पश्चिम, राम मनोहर लोहीया मार्ग, हायटेक परिसर, विनोबा भावे पोलीस स्थानकजवळ असलेल्या तळमजला अधिक एक अशा दुमजली घराच्या छताचा भाग आज दुपारी २.४० च्या दरम्यान पडला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, एल विभाग इमारत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले. या घटनेत चार जण जखमी झाले असून, त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत अफान खान (५), रफिक शेख (४६), इरफान खान (३३), मोहमद जिकरान (६) असे ४ जण जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. राजावाडी रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सचीन यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार ४ जखमींपैकी अफान खान (५) या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.
मृताचे नाव -
अफान खान (५)
जखमींची नावे -
१) रफिक शेख ( ४६)
२) इरफान खान ( ३३)
३) मोहमद जिकरान (६)
कांजूरमार्गला आग -
कांजुरमार्ग (पु) येथील एन.जी.रॉयल पार्क येथे तळमजला अधिक ११ माळे असे बांधकाम असलेल्या इमारतीच्या अकराव्या माळ्यावर दुपारी 1.30 च्या दरम्यान आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, आग नियंत्रणात असल्याची माहिती असून या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाने दिली.