मुंबई - येथील नायर रुग्णालयात ( Nair hospital of Mumbai ) दाखल झालेल्या तीनशेहून अधिक कोरोनाबाधित गरोदर महिलांपैकी सुमारे दीडशे महिलांची प्रसूती झाल्याची ( Corona Positive Women Give Birth ) माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. तसेच तिसरी लाट ( Third Wave of Corona ) फारशी धोकादायक नसल्याचा दावाही डॉ. भारमल यांनी केला आहे.
सर्वाधिक गरोदर महिला नायर रुग्णालयात - मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या नायर रुग्णालयात सुमारे तीनशेहून अधिक कोरोनाबाधित गरोदर महिलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या सर्व महिलांची प्रकृती उपचारादरम्यान स्थिर असल्याचे निदर्शनास आले होते. मुंबईतील विविध रुग्णालयात सुमारे ६०० हून अधिक कोरोनाबाधित गरोदर महिलांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सर्वाधिक गरोदर महिलांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिडशे कोरोना बाधित महिला झाल्या प्रसूत - कोरोना बाधित महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्यात आले. त्यानंतर सुमारे दिडशेहून अधिक महिलांची नायर रुग्णालयात प्रसूती झाली. या दरम्यान त्यांना कोणताही त्रास जाणवला नसल्याची माहिती, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. तसेच उर्वरित महिलांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर नर्सिंग होममध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
तिसऱ्या लाटेचा फारसा धोका नाही - नायर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत असले तरी त्यापैकी अनेकांना अतिशय सौम्य लक्षणे आहेत. त्या सर्वांना योग्य प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांच्या होम कवारंटाईन करण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट अतिशय सौम्य राहिली. त्यामुळे रुग्ण फारसे दगावलेही नाहीत. लवकरच ही लाट ओसरेल, असा दावाही डॉ. भारमल यांनी केला आहे.
नायर रुग्णालयाचे अधिष्ठाताही कोरोनाबाधित - दरम्यान, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल हेसुद्धा कोरोना बाधित झाले आहेत. मात्र, त्यांनी अशा स्थितीतही सौम्य लक्षणे असल्याने स्वतःला कार्यालयात कवारंटाईन करत काम सुरू ठेवले आहे.