मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली ( Covid Third Wave Mumbai ) आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस १०० च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २ वर्षातील सर्वात कमी रुग्णांची ही नोंद आहे. आज ५४ रुग्ण आढळून आले ( Mumbai New Corona Patient ) असून, शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ४२१ सक्रिय रुग्ण आहेत.
५४ नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत आज (९ मार्च) ५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ०७० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ०७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४२१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७६५० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. २ ते ८ मार्च या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.
९९.२ टक्के बेड रिक्त
मुंबईत आज आढळून आलेल्या ५४ रुग्णांपैकी ४३ म्हणजेच ८० टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ११ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ३ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये २८,७०२ बेडस असून त्यापैकी २३७ बेडवर म्हणजेच ०.८ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.२ टक्के बेड रिक्त आहेत.
असे झाले रुग्ण कमी
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४ रुग्णांची नोंद झाली आहे.
२६ वेळा शून्य मृत्यूची नोंद
मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण २६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात ८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत शून्य रुग्ण
धारावीत आज शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आतापर्यंत एकूण ८६५० रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर धारावी हॉटस्पॉट झाली होती. मात्र धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.