मुंबई - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम आणि मध्य रेल्वेची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेच्या भाईंदर-मीरा रोड दरम्यान ट्रेस पासिंगची घटना घडली तर मध्य रेल्वेचा भुसावळ विभागात तांत्रिक बिघाड झाल्याने एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले या दोन्ही घटना ऐन गर्दीच्या वेळी घडल्याने रेल्वे प्रवाशांना चांगल्याच मनस्तापाला समोर जावे लागले आहेत.
पश्चिम रेल्वेवर ट्रेस पासिंगची घटना -
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भाईंदर-मीरा रोड दरम्यान रेल्वे रूळावर एका व्यक्तीने आत्महत्या केली. परिणामी, दुपारच्या सुमारास घटना घडल्याने येथील फेऱ्यांवर परिणाम झाला. एकाच ठिकाणी लोकल बराच वेळ थांबल्याने प्रवासी देखील वैतागले होते. अनेक प्रवाशांना भाईंदर येथे तांत्रिक बिघाड झाल्याचे वाटत होते. त्यामुळे समाज माध्यामावरून भाईंदर येथे तांत्रिक बिघाड झाल्याचे संदेश फिरत होते. मात्र, त्यानंतर येथे आत्महत्या झाल्याची माहिती प्रवाशांना समजली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे मृतदेह उचलून नेण्यामध्ये आणि सर्व रेल्वे रूळ व्यवस्थित करण्यात बराच वेळ गेल्याने लोकल सेवा खोळंबली होती.
मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाड -
मध्य रेल्वेवरील भुसावळ विभागात रविवारी मध्यरात्री डाऊन दिशेकडे ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक्स्प्रेस सेवा खोळंबली. रात्रीच्या सुमारास घटना घडल्याने अनेक एक्स्प्रेस जागच्या जागीच थांबल्या होत्या. घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मिळताच, घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली . मात्र हा बिघाडा दुरुस्त करण्यासाठी मध्य रेल्वेला तब्बल 8.30 तास लागल्याने एक्स्प्रेस गाड्या रखडून पडलेल्या होत्या. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या काही एक्स्प्रेस रद्द केल्या तर, काही एक्स्प्रेस वसई रोडच्या दिशेने वळविण्यात आल्या. तर, इगतपुरी येथे एक्स्प्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थ, नाष्टा, पाण्याची सोय करून दिली. मात्र, या घटनेमुळे कसारा, कर्जतहून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या.