मुंबई : राज्यात मुंबई वगळता बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार असल्याने महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील सदस्यांची संख्या वाढणार आहे. निवडणूक आयोगानेही ३० नोव्हेंबरपूर्वी यासंदर्भात निर्णय घेण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारची यामुळे धावपळ उडाली आहे.
राज्य सरकारची धावपळ
कोरोनामुळे देशासह राज्याची सन २०२१ची जणगणना झालेली नाही. आगामी महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. फेब्रुवारी-मार्चदरम्यान १५ महानगर पालिकांच्या तसेच सुमारे १०० हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता बहुसदस्यीय प्रभाग पध्दत लागू केली जाणार आहे. त्यानुसार सदस्य संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगाने महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील सदस्य संख्येबाबत येत्या ३० तारखेपूर्वी निर्णय घ्यावा, अशा सूचना करताना त्यानंतर कोणताही बदल स्वीकारणार नाही, असे संकेत दिले आहेत. राज्य सरकारची यामुळे मोठी धावपळ उडाली आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग वाढीवर राज्य सरकार ठोस निर्णय घेण्याची चिन्हे आहेत.
१० वर्षातील लोकसंख्येवर सदस्य वाढ ठरणार
२०११च्या लोकसंख्येनुसार निवडणुका झाल्यास लोकांवर अन्याय होईल, अशी भूमिका घेत महापालिकांमधील सदस्य संख्या वाढविण्याची भूमिका नगरविकास विभागाने घेतली आहे. प्रत्येक शहराची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत १५ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिकेत नगरसेवकांची संख्या १५ टक्यांनी वाढवली जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या अध्यादेशाच्या माध्यमातून महापालिका कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. यानंतर सदस्य वाढीबाबत निर्णय होणार असल्याचे समजते. मुंबईत मात्र सदस्य संख्या वाढवली जाणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.
अशी आहे स्थिती
राज्यात मुंबईसह २७ महापालिका आणि ३७९ नगरपालिका-नगरपंचायती आहेत. दर दहा वर्षांनी जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका-नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या ठरवली जाते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणुका पार पाडण्यात येतात. सन २०११ च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान १६ तर जास्तीत जास्त ६५ सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान ६५ तर जास्तीत जास्त १७५ पर्यंत आहे. मात्र, मुंबई महानगर पालिकेत ही संख्या २२७ झाली आहे.