मुंबई - राज्यात कोरोना उग्र रुप धारण करत आहे. पहिल्या लाटेत जितकी झपाट्याने रुग्णांची संख्या वाढली नाही. तितक्या झपाट्यानं दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी राज्यात रुग्णांनी 40 हजाराचा आकडा पार केला. वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणली नाही. तर राज्यात रुग्णांना खाटांची कमतरता भासू शकते.
राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. अनेक उपाययोजना करुनही कोरोनाची स्थिती आटोक्यात येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला आरोग्य सचिव प्रदीप व्यास देखील उपस्थित होते. या बैठकीत राज्याची सद्यस्थिती आणि उपलब्ध उपाययोजनावर चर्चा करण्यात आली.
सध्य खाटांची स्थिती -
सध्या 3 लाख 57 हजार आयसोलेशन खाटांपैकी 1 लाख 7 हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. 60 हजार 349 ऑक्सिजन खाटांपैकी 12 हजार 701 खाटा , 19 हजार 930 खाटांपैकी 8 हजार 324 खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. 9 हजार 30 व्हेंटिलेटर्सपैकी 1 हजार 881 वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे.
राज्यात कोरोना स्थिती गंभीर -
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन आठवडय़ांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने शनिवार मध्यरात्रीपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून. सभागृहे किंवा नाटय़गृहांचा उपयोग करता येणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.