मुंबई - मुंबईत कॅम्प लावून तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांच्या कोविड चाचण्याही करण्यात येत होत्या. आता हे प्रमाण कमी झाल्याने चाचण्याची संख्या कमी झाली आहे. कोविडच्या रोजच्या चाचण्याची संख्या ५० हजारावरुन ३५ हजारांवर आली आहे. तसेच बाधित रुग्णांची संख्याही कमी झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
चाचण्या आणि बाधितांची संख्या कमी -
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्य़ानंतर पालिकेने जास्तीत जास्त चाचण्यांवर भर दिला. राज्यात निर्बंध लागू होण्यापूर्वी मॉल तसेच सार्वजनिक ठिकाणी फेरीवाले, घरकामगार तसेच विभागवार गर्दीच्या ठिकाणी कॅम्प आयोजित करून चाचण्या केल्या जात होत्या. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांच्या चाचण्यांवरही प्रशासनाने भर दिला. त्यामुळे रोजच्या चाचण्याची संख्या ५० हजारावर पोहचली होती. आता चाचण्या कमी करून रुग्णसंख्या कमी दाखवली जाते आहे, असा आरोप प्रशासनावर केला जात आहे. मात्र कॅम्प लावून आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने चाचण्यांची संख्या कमी झाली आहे, असे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत एप्रिल महिन्याच्या मधल्या काळात १०० चाचण्यामागे २५ ते २६ व्यक्ती बाधित असल्याचे आढळत होते. ते प्रमाण आता १२ ते १४ टक्क्यांच्या दरम्यान आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
64 हजार 018 सक्रिय रुग्ण -
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 44 हजार 699 वर पोहचला आहे. मृतांचा आकडा 13 हजार 072 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 66 हजार 051 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 64 हजार 018 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 79 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 115 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 1 हजार 101 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत एकूण 53 लाख 80 हजार 473 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.