मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. काही प्रमाणात हा प्रसार कमी झाला असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाला. रुग्णसंख्या वाढत असतानाच सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. १ मार्च ते १ एप्रिल या महिनाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ४६ हजाराने वाढली असून सध्या मुंबईत ५५ हजार ६९१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरातील ही सर्वाधिक सक्रिय रुग्णांची नोंद आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रसार झाला. पालिकेने केलेल्या प्रयत्नामुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला. यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होवून रुग्णसंख्या ६ ते ८ हजारावर गेली आहे.
मुंबईत ३१ मार्च रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ लाख १४ हजार ७१४ वर पोहचला आहे. मृतांचा आकडा ११ हजार ६८६ वर तर रुग्ण बरे होण्याची संख्या ३ लाख ५० हजार ६६० वर पोहचली आहे. ३१ मार्चला मुंबईत एकूण ५१ हजार ४११ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४९ दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ४० लाख ८३ हजार १७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा - राज्यात टाळेबंदी लावणार नाही, निर्बंध आणखी कडक केले जातील - वडेट्टीवार
अशी झाली सक्रिय रुग्णांमध्ये वाढ -
१ जानेवारीला ८ हजार ५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. त्यात फेब्रुवारी महिन्यात घट होऊन १ फेब्रुवारीला ५ हजार ६५६ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होते. २८ फेब्रुवारीला यात वाढ होऊन ९ हजार ७१५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली. १५ मार्चला १४ हजार ५८२, २५ मार्चला ३३ हजार ९६१, २९ मार्चला ४७ हजार ४५३ तर ३१ मार्चला ५१ हजार ४११ तर १ एप्रिलला ५५ हजार ६९१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. १ मार्च ते १ एप्रिल या महिनाभराच्या काळात तब्बल ४६ हजार १ सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
८२ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण -
मुंबईत ३१ मार्चला एकूण ५१ हजार ४११ सक्रिय रुग्ण होते. त्यातील ४२ हजार ३२५ म्हणजेच ८२ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. ८ हजार ४६६ म्हणजेच १६ टक्के रुग्ण लक्षणे असलेले आहेत. तर ६२० रुग्ण क्रिटिकल आहेत. क्रिटिकल रुग्णांचे प्रमाण १ टक्के इतके आहे.
पॉझिटिव्ह रेट वाढला -
मुंबईत गेले काही दिवस २० ते २५ हजार कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यात सुमारे ९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येत होते. मुंबईत सध्या चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे पॉझिटिव्ह रेट १०.०४ टक्के इतका झाला आहे.
हेही वाचा - 'पीएमपीएमएल' बंद करू नका; संचारबंदीमधील काही निर्बंधांना भाजपचा विरोध