मुंबई : मध्य रेल्वेकडून नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येतात. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज गल्लीमध्ये रेल्वे प्रशासनाकडून 'हर्बल गार्डनची' निर्मिती करण्यात आली आहे. आता नाशिकच्या धर्तीवर मुंबईच्या काही स्थानकांवरही ‘ऑक्सिजन पार्लर’ उभारण्याची योजना आखली जात आहे. यात १२ तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा समावेश असणार आहे.
स्थानकांवरील जागेचे सर्वेक्षण सुरू
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मध्य रेल्वे गेल्या काही वर्षांपासून महत्वपूर्ण योजना राबवत आहे. २०१९ मध्ये मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकात हवा शुद्धीसाठी ऑक्सिजन पार्लर(रोप वाटिका) सुरु करण्यात आले आहे. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनकडून(नासा – NASA) मान्यता प्राप्त १८ प्रकारच्या सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या रोपट्यांच्या समावेश आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातावरण प्रवाशांना मिळत आहे. आता नाशिकच्या धर्तीवर मुंबईच्या प्रमुख स्थानकांवरही याच पद्धतीचे ‘ऑक्सिजन पार्लर’ उभारण्याची योजना आखली जात आहे. सध्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील जागेचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महसूलात होणार वाढ
भारतीय रेल्वेचे उत्पादन वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम म्हणजेच एनआयएनएफआरआयएस मार्फत अनेक योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड स्थानकावर ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजन पार्लरच्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला ७५ हजार रुपयांचा महसूल मिळत आहे. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणालाही हातभार लागत आहे.
"या" स्थानकांवर सुरु होणार
‘ऑक्सिजन पार्लर’ उभारण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण झाले आहे. तसेच येत्या काही दिवसांत ‘ऑक्सिजन पार्लर’साठी निविदा काढण्यात येणार आहे. लवकरच ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याच्या 3 ते 4 महिन्यांत ‘ऑक्सिजन पार्लर’ उभारण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकात पर्यावरण स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी रेल्वेकडून हा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.