मुंबई - उत्तर चकमकीत ठार झालेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याचा हस्तक अरविंद त्रिवेदी ऊर्फ गुड्डण याला मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी ठाण्यात अटक केली. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे 3 जुलै रोजी विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये आठ पोलीस वीरगतीस प्राप्त झाले. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच शुक्रवारी मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.
मात्र पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. यातील महत्त्वाचा आरोपी अरविंद त्रिवेदी ऊर्फ गुड्डण याला मुंबईच्या एटीएस पथकाच्या जुहू युनिटने ठाणे कोलशेत येथून अटक केली आहे. जुहू एटीएस युनिटच्या पथकातील दया नायक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आलीय. विकास दुबे याचा जवळचा सहकारी अरविंद त्रिवेदी हा आरोपी ठाणे कोलशेत या ठिकाणी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाण्यातील कोलशेत येथे पोलिसांनी सापळा रचला.
अरविंद उर्फ गुड्डण त्रिवेदी (वय - 46) याच्यासह वाहन चालक सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी (वय - 30) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
2001 साली उत्तर प्रदेशातील चौबेपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तत्कालीन राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या खुनाच्या गुन्ह्यात विकास दुबेसह अरविंद त्रिवेदी देखील सहभागी होता. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी रोख रकमेचे बक्षिस जाहीर केले होते. या आरोपीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफला माहिती देण्यात आली आहे.