मुंबई - आयएनएस विक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणी ( INS Vikrant Fund Fraud Case ) भाजपचे नेते किरीट सोमय्या ( BJP Leader Kirit Somaiya )आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या ( Nil Somaiya ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ( Mumbai Police Economic Offences Wing ) किरीट सोमय्या यांच्या घरी धडक दिली आहे. दोन्ही पिता-पुत्रांच्या घरावर पोलिसांनी नोटीस बजावली ( Police Summonsed Kitit Nil Somaiya ) आहे. या नोटिशीत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना बुधवार 13 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अन्यथा वॉरंट जारी करणार : किरीट सोमय्या यांना या आधीही चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ते आले नव्हते. त्यामुळे त्यांना स्मरण देणारी ही नोटीस त्यांच्या घरावर लावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस लावली आहे. सोमय्या आणि त्यांचा मुलगा घरी नाहीत. उद्या दोघे चौकशीसाठी हजर न राहिल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल. सोमय्या पिता- पुत्रांविरोधात वॉरंट जारी केलं जाईल. दोघांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं तीन पथकं तयार केली आहेत. त्यामुळे आता सोमय्या या नोटिशीला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे शूरपणाचं लक्षण नाही : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा ठावठिकाणा पोलिसांना माहित नाही. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे नेमके कुठे गेले, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती गृह विभागाकडे नाही. केंद्रानं सोमय्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षा दिलेली व्यक्ती कुठे आहे? याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाला विचारणा करू, असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. दुसऱ्यांवर आरोप करणं सोपं असतं. मात्र, स्वत:वर आरोप झाले की, पळून जायचं हे काही शूरपणाचं लक्षण नाही असा टोलादेखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लगावला आहे.