मुंबई - शिकागो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती भारतासाठी नक्कीच चिंताजनक आहे. कारण देशातील काही राज्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांचे आयुर्मान कमी होत आहे. या अहवालात महाराष्ट्राचेदेखील नाव आहे. उत्तर भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषित प्रदेश म्हणून या अभ्यासात समोर आले आहे. याचा परिणाम थेट हा या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुर्मानात होत आहे. दिल्ली व कोलकाता येथील नागरिकांचे आयुर्मान ९ वर्षांनी घटेल, असेही अहवालमध्ये सांगण्यात आले आहे.
धोकादायक संकेत
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. २००० सालच्या प्रारंभाच्या तुलनेत या दोन्ही राज्यांमधील नागरिकांचे २.५ ते २.९ वर्षांचे अधिकचे आयुर्मान कमी होत आहे, हे अत्यंत धोकादायक संकेत आहेत. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट (EPIC)ने तयार केलेल्या अहवालानुसार, मध्य, पूर्व आणि उत्तर भारताच्या पट्ट्यात राहणाऱ्या सुमारे 48 कोटी लोकांना वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता खूप वेगाने खालावली आहे.
प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढू लागली
लॉकडाऊनमध्ये हवेची गुणवत्ताही सुधारली होती, मात्र पुन्हा लॉकडाऊन ज्याप्रमाणे उठू लागला तसे प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढू लागली आहे. कारण वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. याकडे राज्य सरकार आणि प्रत्येक नागरिकाने ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय केले पाहिजे?
मुंबई आणि दिल्लीमध्ये नागरिकांचे आयुर्मान कमी होण्याचे प्रमुख कारण, रस्ते वाहतूक, बांधकाम यामुळेच कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. तसेच शरीराला घातक असलेल्या वायूंचे प्रमाणदेखील यामुळे वाढते. या सर्वांचा नागरिकांच्या आयुर्मानावर परिणाम होताना दिसत आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रत्येक सेक्टरवर काम करणे आवश्यक आहे. सध्या खासगी वाहने मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. त्यामुळेदेखील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. सायकल आणि चालणे याकडे नागरिकांनी जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. कारखान्यांतून निघणाऱ्या धुरामधून 33% प्रदूषण मुंबईमध्ये होते. हे जर कमी करायचे असेल तर आधुनिक गोष्टींचा वापर करून हे प्रदूषण कमी करणे शक्य आहे. जर याकडे लवकर लक्ष दिले नाही, तर गंभीर आजारदेखील होऊ शकतात. फक्त नागरिकांचीच नाही तर नवीन जन्म घेणाऱ्या शिशूचेदेखील आरोग्य धोक्यात आहे, असे हवामान अभ्यासक भगवान केसभट्ट यांनी सांगितले.
वायू प्रदूषण घटल्यास होतात चमत्कारिक परिणाम
वायू प्रदूषण घटल्यास शरीरावार त्याचे चमत्कारिक परिणाम होतात, असे एका आभ्यासातून समोर आले आहे. 'एन्व्हायरोमेंटल कमेटी ऑफ दी फॉरम ऑफ इंटरनॅशनल रेस्पिरेटरी सोसायटी'ने 'हेल्थ बेनेफिट ऑफ एअर रिडक्शन' या विषयावर अभ्यास केला होता. या अभ्यासावरून त्यांनी ही माहिती दिली आहे. 'थोरासिस सोसायटी जर्नल' या मासिकेत ही माहिती छापून आली आहे. वायू प्रदूषण कमी केल्यास प्रकृती चांगली राहत असून शरीराची रोग प्रतिरोधक क्षमताही वाढत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सरकारांनी 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशन'च्या पर्यावरण संरक्षण विषयक मार्गदर्शक सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या विषयावर लिखाण करणाऱ्या आघाडीच्या लेखिका डॉ. डीन श्रौफनेगल यांनी सांगितले आहे.