मुंबई - रेल्वे प्रशासनाने रविवारी रात्री उशिरा मुंबईत लोकल सेवा सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे सोमवारी लोकलमध्ये गर्दी दिसून आली नाही. परंतु, मंगळवारी लोकलमध्ये प्रवासी संख्या वाढल्याने फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.
मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली आहे. लोकल सुरू झाल्याची माहिती मिळताच मंगळवारी प्रवाशांनी लोकलची वाट धरली. त्यामुळे मंगळवारी लोकलच्या एका सीटवर तीन-तीन कर्मचारी बसले होते. तर, काही कर्मचारी उभ्याने प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यातही मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सीएसएमटी ते कल्याण या लोकलमधील महिला डब्यात तर गर्दीचे प्रमाण अधिक होते.
हेही वाचा... भारत-चीन सीमेवरील झटापटीत तिघांना वीरमरण
मंगळवारी बसप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार आणि मध्य रेल्वे मार्गवरील सीएसएमटी स्थानकावर कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. लोकलमध्ये फिजिकल डिस्टनसिंगच्या नियमांचे कोणतेही पालन होताना दिसले नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या नावे तक्रारचा पाढा वाचला.
एखादी लोकल सुटली, तरी चालेल पण लोकलमध्ये गर्दी करू नये. फिजिकल डिस्टनसिंगचे पालन होण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनीही खबरदारी घ्यावी. मध्य रेल्वे प्रशासन आपल्या परीने काम करत आहे. सुरक्षा विभाग देखील आपली कामे करत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.