मुंबई - सर्वसामान्यांना आता वीज बिलाचा झटका सोसावाच लागणार आहे. राज्यातील वीजग्राहकांना मिटर रिडींगप्रमाणे जे बिल आले आहे ते बिल त्यांना भरावे लागेल. त्यात कुठलीही सवलत मिळणार नाही, असे स्पष्टीकरण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिले आली. सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रीडिंगप्रमाणे आलेले बिल भरावेच लागेल
ज्या ग्राहकांना मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिले आलेली आहेत, त्यांना ती भरावी लागणार आहेत. तर ज्यांची अधिकची बिले आली होती, त्यासाठी आम्ही समिती स्थापन केली होती आणि त्या समितीकडून सुचवण्यात आलेल्या उपायांवर कारवाई सुरू आहे. ज्यांना अधिकचे बिल भरण्यासाठी अडचणी येतात, त्यांच्यासाठी आम्ही अनेक प्रकारच्या सवलतीही दिल्या आहेत, त्यासाठी आम्ही आदेशही दिले असून त्यात सविस्तरपणे आम्ही ग्राहकांना सवलती दिल्या आहेत. यामुळे आता सवलती देता येणार नाहीत, असेही राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा - जळगावात पत्नीच्या मृत्यूनंतर तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करुन घेतला सर्वांचा निरोप
आता सवलत नाही
आम्ही अनेकांकडून वीज खरेदी करतो, त्यांना पैसे द्यावे लागतात सध्या आम्ही 69 हजार कोटी रुपये तोट्यात आहोत, तरीही आम्ही सवलती देतो. त्यामुळे आम्हालाही अनेक अडचणी येतात, त्यासाठी यापुढे आम्हाला ग्राहकांना सवलती देता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन काळात ग्राहकांना 24 तास वीज पुरवठा केला. याच काळात अनेक ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीजबिले आली होती. त्यांना अधिकची बिले आली, त्यात कपात करण्यात आली आहे, अनेकांची कार्यवाही सुरू आहे. मात्र ज्यांना रीडिंगप्रमाणे बिले आलेली असतील त्यांना आता सवलती देता येणार नाही, असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - महिलेचा गळा चिरून आरोपीने तोंडात फोडला सुतळी बॉम्ब; प्रेमसंबंधातून कृत्य