मुंबई : ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये वागत आहे, त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरून पलटवार केला आहे. गांजावर इतके प्रेम बरं नाही अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणेंचे ट्विट
"मालकाच्या घरीच 'गांजाचा बादशाह' असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांजावर इतके प्रेम बरं नाही" असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
सामना अग्रलेखात नेमके काय म्हटले?
एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात' असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, एनसीबीने या सगळ्याचा तपास करायला हवा. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपला सत्तेचा माज आला आहे. पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही. शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडले गेले त्यावरचा हा संताप आहे, पण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा उल्लेख 'एकेरी' भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले. असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा - ईडीसह किरीट सोमैयांना काश्मीरला पाठवा, दहशतवादी पळून जातील -संजय राऊत