मुंबई- ग्रेटा थनबर्ग टूल किट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या विरोधात दिल्लीत अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. त्यानंतर या संदर्भात दिल्लीतील एक तपास पथक मुंबईत निकिता यांच्या घरी चौकशी करता दाखल झाले होते. निकिता यांची दिल्ली पोलीसांकडून तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली आहे. मात्र, या अगोदरच अॅड. निकिता जेकब यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. सोमवारी या याचिकेवरील सुनावणी टळली असून मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. स्पेशल सेलच्या पथकाकडून काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, एक हार्ड डिक्स, पेन ड्राइवसारख्या वस्तू ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांच्या समोर ही याचिका आलेली आहे. आता मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे. दिल्ली न्यायालयाकडून अॅड. निकिता जेकब यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई होणार होती. त्यामुळे अॅड. निकिता जेकब यांनी तत्काळ अटकपूर्व जामिनाची याचिका दाखल केलेली होती.
काय आहे प्रकरण-
शेतकरी आंदोलासंबंधी सोशल मीडियावरून पोस्ट करताना टुलकिटचा (toolkit) वापर झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सायबर सेलने बंगळुरातील एका २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्तीला अटक केली आहे. दिशा रवी असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिनेही टुलकिटचा वापर केला होता. त्यामुळे याची जगभर चर्चा झाली होती. तिला दिल्ली न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर दिशाची सहकारी असलेली मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या विरोधात दिल्लीत अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.
जागतिक तापमानवाढीविरोधात लढा देणाऱ्या ग्रेटा थनबर्ग या मुलीविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. भारतात सुरू असलेल्या कृषी कायदे विरोधी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केल्यामुळे ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. रिहाना या आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केल्यानंतर ग्रेटानेही याबाबत ट्विट केले होते.
ग्रेटाने दिल्लीमध्ये केलेले इंटरनेट बॅन ही नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली असल्याचे म्हणत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. शेतकरी आंदोलनासंदर्भात सामाजिक तणाव निर्माण करणारी एक 'टूल किट' सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.