मुंबई - तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला आहे.
हेही वाचा - मुंबईमधील १० हजार सोसायट्यामध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण
वाझे हा नजकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली आहे. आज उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटले आहे की, सचिन वाझेंवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे. त्यामुळे, त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये.
जर याचिकाकर्त्या आरोपीला नजरकैद दिली गेली तर, तो न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातून फरार होईल आणि कथितरित्या त्याचे सहकारी असलेल्या संरक्षित साक्षीदार आणि फिर्यादी साक्षीदारांसदर्भात छेडछाड करेल, अशी सर्व शक्यता आहे. या प्रकरणात साक्षीदार कोण आहेत? याचा शोध घेणे वाझेसाठी अवघड नाही. सध्या साक्षीदारांची ओळख आणि पत्ते सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. परंतु, वाझेंना मुंबई परिसरातील सर्व माहिती असून तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे, त्यामुळे अडचणी येऊ शकतात, असे एनआयएने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.
दरम्यान बायपास सर्जरीनंतरच्या काळजीसाठी न्यायालयीन कोठडीतून नजरकैदेत हलवण्यात यावे, या मागणीसाठी सचिन वाझे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे शपथपत्र सादर करण्यात आले. सचिन वाझेंनी आपण पूर्णपणे ठिक होईपर्यंत घरी नजरकैदेत ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती.
सचिन वाझेंवर कोणत्या कलमान्वये कारवाई?
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. एनआयए ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286 - जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जिवाला धोका होईल, असे वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506 (2) – दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटके बाळगणे याचा समावेश आहे.
हेही वाचा - एसटीप्रवास दरवाढ : उद्या (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर बेमुदत उपोषण