मुंबई - राज्यामध्ये कोरोना उपचारासाठी असलेल्या विशेष रुग्णालयांमध्ये आणि विलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या ठिकाणी आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक खाटांवर आता ऑक्सिजन मास्क लावण्यात येईल आणि त्याला ऑक्सिजन पुरवठ्याची सोय त्याठिकाणी केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी येथे दिली.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, ''कोरोना उपचारासाठी व्हेंटिलेटवर भर देण्याऐवजी रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यात येणार आहे. याबाबत रुग्णालयांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक बेडला ऑक्सिजन मास्क असेल आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येईल. त्यामुळे उपचारादरम्यान रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल.''
''मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये, म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरूवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे ७ दिवसांवर गेला आहे. हा दर २० ते २५ दिवसांवर यावा यासाठी प्रयत्न केले जात आहे'', असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.