मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात आता कोविडनंतर उद्भणाऱ्या म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण सापडत आहेत. मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचे तब्बल १११ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अनेक रुग्ण अतिगंभीर स्वरूपाचे आजारी आहेत.
वैद्यकीय भाषेत म्युकरमायकोसिस असे म्हटल्या जाणाऱ्या या आजाराने रुग्ण आता मुंबईसह राज्यातील इतरही जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सापडू लागल्याने चिंतेची बाब आहे. वेळीच निदान न झाल्यास अथवा उपचार न मिळाल्यास हा आजार बळावत जातो. यातून रुग्णाचा जबडा किंवा डोळा काढावा लागू शकतो. याचे संक्रमण मेंदुला झाल्यास प्रसंगी प्राणही गमवावा लागू शकतो.
मुंबईमध्ये रुग्णांची संख्या अधिक -
मुंबईमध्ये एकीकडे कोरोनाचा प्रसार सुरू असताना कोरोना रुग्णांना म्युकर मायकोसिस हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचे तब्बल १११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या केईएम, नायर आणि सायन रुग्णलयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरील -
कोरोना रुग्णांना म्युकर मायकोसिस हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत या आजाराचे किती रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार कसे केले जात आहेत, तसेच त्यांच्यावर उपचारासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती देण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे केली. याबाबत माहिती देताना काकाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना मुंबई शहरात १११ म्युकर मायकोसिस रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी शीव रुग्णालयात ३२, केईएम रुग्णालयात ३४, नायर रुग्णालयात ३८ व कूपर रुग्णालयात ७ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरिल आहेत. हा आजार बुरशीजन्य आहे. परंतु संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही, असे काकाणी यांनी सांगितले.
तज्ज्ञ डॉक्टरांचा गट -
म्युकर मायकोसिस या आजाराबाबत कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा गट तयार केलेला आहे. आजार होऊ नये, झाल्यास उपचार पद्धती उपकरणे, औषधे याबाबत उपचार प्रोटोकॉल निश्चित केलेला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु केली आहे. रोग टाळण्यासाठी उपाययोजनांची खबरदारी माहिती सर्व रुग्णालयात दिली आहे. कोविड उपचार पद्धती स्टुरॉईड आणि टोकिलिझुमॅबचा अतिवापर टाळावा. विशेषतः डायबेटिक रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी. म्युकर मायकोसिस या आजारावर वापरण्यात येणाऱ्या ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शन व इतर औषधे खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरु केलेली आहे. तोपर्यंत रुग्णालयांना स्थानिक स्तरावर खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्युकर मायकोसिस आजाराच्या रुग्णांना ८ ते १२ आठवडे निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती काकाणी यांनी दिल्याचे प्रभाकर शिंद यांनी सांगितले.
राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील म्युकर मायकोसिसची स्थिती -
1) औरंगाबाद - कोरोनावर उपचार सुरु असताना आणि उपचार घेऊन रुग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) या जंतूमुळे हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले. औरंगाबादेत या आजारामुळे आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून १३ जणांचे डोळे काढावे लागले, तर ९६ जणांच्या जबड्यावर आणि सायनसमुळे ४५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
2) चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे 18 रुग्ण आढळून आले आहेत.
3) पुणे - म्युकर म्युकोसिसचे पुणे परिसरात 29 रुग्ण
4) नाशिक - डॉ शब्बीर इंदोरवाला या रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजाराने पीडित 35 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 150 रुग्णांवर उपचार झाले असून त्यातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
5) नागपूर - शासकीय दंत महाविद्यालयात आतापर्यंत 45 रुग्ण हे म्युकर मायकोसिसचे नोंद झाले आहे.
यात 8 रुग्णांवर सर्जरी करून जबडा काढण्यात आला आहे. यात 13 रुग्ण हे नाक कान घसा यांच्याकडे पाठवण्यात आले असून त्यानंतर त्यांच्यावर गरजेनुसार शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या सोबत 24 रुग्णांवर प्राथमिक तपासणी केली असून त्यांना म्युकर मायकोसिस झाल्याची नोंद आहे, बहुतांश रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत.
या सोबतच खासगी रुग्णलयात सुद्धा अनेक रुग्ण उपचार घेत असून अनेकांची तपासणी करण्यात येत आहे.
काय आहे म्युकर मायकोसिस -
कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्युकर मायकोसिस हा आजार नव्हता, मात्र दुसऱ्या लाटेत मधुमेही कोविड रुग्णांमध्ये हा आजार जाणवत आहे. हा संसर्गजन्य आजार नसून मात्र वेळीच त्याचे निदान होवून त्यावर उपचार अथवा शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण कायमस्वरुपी बरा होवू शकतो, अथवा रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते. या आजाराची लक्षणे सांगायचे झाल्यास कोरोना रुग्णाच्या चेहऱ्यावर डोळ्याला सूज येणे, दिसायला बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायला त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. जर अशी लक्षणे दिसली तर जवळच्या कान, नाक, घसा तज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करणे गरजेचे आहे, अन्यथा आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.