मुंबई - शहर परिसरात गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत होते. मात्र त्यात पुन्हा आता वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे नव्याने 355 रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा 3445 वर पोहोचला असून आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोनाचे गेल्या 24 तासात 136 रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 ते 18 एप्रिल दरम्यान खासगी लॅबमध्ये केलेल्या 219 रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामुळे मुंबईत नव्याने 355 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला असल्याने मृतांचा आकडा 150 वर पोहोचला आहे. 12 मृतांपैकी 8 जणांना इतर आजार होते तर 4 जणांचा वार्धक्याने मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत सध्या 2887 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत 5 एप्रिलपासून आतापर्यंत ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्या विभागात 146 क्लिनिकमध्ये 5642 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील 2126 संशयितांचे नमुने घेण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति आणि कमी जोखमीच्या 81 हजार 612 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 16 हजार 043 व्यक्तींनी 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे.