मुंबई - कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी कोरोनाचे नवीन रुग्ण अजूनही आढळत आहेत. राज्यात ३,२१८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,३८,८५४ वर पोहचला आहे. राज्यात आज ५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात कोरोनाने आजतागायत एकूण ४९,६३१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या, राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५३,१३७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा-शिवसेनेने आपली भूमिका थोपवल्यास सरकारला धोका; संजय निरुपम यांचा इशारा
बरे होण्याचे ९४.६४ टक्के प्रमाण
राज्यात आज २,११० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण १८,३४,९३५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. तपासण्यात आलेल्या १,२८,९०,४४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३८,८५४ नमुने म्हणजेच १५.०४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,५८,६६८ व्यक्ती घरात विलिनीकरणात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा-लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे चित्र-
राज्यात जूनदरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे.
राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. तर राज्यात १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील चार जिल्ह्यात लसीकरणाची होणार रंगीत तालीम-
कोरोना लसीकरणाचा 'ड्राय रन' देशभर २ जानेवारीला होणार असून त्यासाठी राज्यातील चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.