मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत रुग्ण शोधण्यासाठी विविध तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोरेगावच्या 'नेस्को'त आवाजावरुन स्क्रिनिंग करण्याच्या अभ्यासाला येत्या १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ३ महिने २ हजार रुग्णांवर प्रयोग करत हा अभ्यास केला जाणार आहे. तीन महिन्यांनंतर याचा अहवाल सादर केला जाईल. ही पद्धती योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच याचा वापर मुंबईत स्क्रिनिंगसाठी केला जाणार असल्याचे नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी सांगितले.
कोरोना संशयित रुग्णांना शोधण्यासाठी विविध स्क्रिनिंग पध्दतींचा वापर केला जात आहे. यामध्ये ताप मोजणे, ऑक्सिजनची पातळी तपासणी याचा समावेश आहे. मात्र, येत्या तीन महिन्यात आणखी एका अत्याधुनिक पध्दतीची भर पडणार आहे. ती म्हणजे व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स अर्थात आवाजावरून स्क्रिनिंग पद्धती. ही पद्धती योग्य आणि गुणवत्तापूर्ण आहे का याचा गोरेगाव येथील नेस्को कोव्हिड सेंटरमध्ये तीन महिने अभ्यास केला जाणार आहे. १ सप्टेंबरपासून या अभ्यासाला (रिसर्च) सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ. आंद्राडे यांनी दिली आहे. नेस्कोतील २००० पॉझिटिव्ह रुग्णांवर प्रयोग करत हा अभ्यास केला जाणार आहे. तीन महिन्यांनंतर याचा अहवाल सादर झाल्यानंतर ही पद्धती योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच याचा वापर मुंबईत स्क्रिनिंगसाठी केला जाणार असल्याचेही डॉ.आंद्राडे यांनी सांगितले.
अमेरिका आणि इस्त्राईलमध्ये ही पद्धती स्क्रिनिंगसाठी वापरण्यात येते. नागरिकांच्या आवाजावरून केवळ ३० सेकेंदात कोरोनाची लक्षणे आहेत की नाहीत हे समजते. त्यानंतर लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटिजेन किंवा आरटीपीसीआर कोरोना टेस्ट केली जाते. खूपच कमी वेळात संशयित रुग्ण शोधता येत असल्याने मुंबईतही हे शक्य आहे का असा विचार पुढे आला. यानंतर मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेत 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीबरोबर मिळून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका आणि इस्त्रायली कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे आता १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.
असा' होईल अभ्यास -
नेस्कोमधील दोन हजार रुग्णांवर अभ्यास केला जाणार आहे. त्यानूसार ५०० रुग्णांच्या आवाजाचे नमुने संबंधित कंपनीच्या अॅपचा वापर करत मोबाईलवरुन घेतले जातील. हे नमुने आणि रुग्णांची सर्व माहिती, त्यांचे कोरोना टेस्ट अहवाल, एक्सरे इतर अहवालही इस्रायला पाठवले जातील. तर इतर १५०० रुग्णांचे केवळ आवाजाचे नमुनेच पाठवले जातील. या सर्व नमुन्याचा अभ्यास करुन कंपनी आपला अहवाल देईल. कंपनीच्या अहवालानंतरच ही पद्धती योग्य आहे की नाही, याचा वापर करणे व्यवहार्य आहे की नाही हे स्पष्ट होईल. त्यानंतरच याचा वापर करण्यासाठीचा अंतिम निर्णय पालिकेकडून घेतला जाणार आहे. या सर्व प्रक्रियेला तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
चार भाषांमध्ये घेतले जाणार नमुने -
चार भाषांमध्ये रुग्णांच्या आवाजाचे नुमने घेण्याची सोय कंपनीच्या अॅपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती या भाषेचा समावेश आहे. तर रुग्णाला यात या चारपैकी कोणत्याही एका भाषेत १ ते २० पर्यंतचे आकडे मोजावे लागतील. तर पाच वेळेस खोकायचे आहे. या दोन्ही आवाजाच्या नमुन्यावरून कोरोनाची लक्षणे आहेत का, असतील तर ती सौम्य, मध्यम वा गंभीर आहेत हे तपासत त्याचा अंतिम निष्कर्ष दिला जाणार आहे.