मुंबई - शिवसेना विरोधात भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढू लागले आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाला बोलावले असून दीपक केसरकर दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली होती. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने दिल्ली दरबारी शिंदे गटाचे संबंध घनिष्ठ होत आहेत. काही दिवसांवर राष्ट्रपती पदाची निवडणूक येवून ठेपली आहे. या निवडणुकीपूर्वी एनडीएकडून शिंदे गटाला निमंत्रण ( NDA Invitation to Shinde group ) देण्यात आले आहे.
सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावी, अशी भूमिका यांनी घेतली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अधिकृत भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहेत.
मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक - 18 जुलै रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार करत आहेत. ठाकरेंवर खासदारांचाही दबाव वाढत आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांकडून लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी सुरू असल्याची चर्चा आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनी बंड केल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक झाली आहे. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.