मुंबई - चीनने केलेल्या हल्ल्यात आपल्या जवानांना वीरमरण आले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कारवाई केली नाही. या मुद्यावरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवार) अनोखे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चिनी खुळखुळे' भेट पाठवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला.
चीन सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. त्यामध्ये आपले जवान हुतात्मा होत आहेत. परंतु, केंद्र सरकार यावर ठोस पावले उचलताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी लहानसहान गोष्टीवर ट्वीट करत असतात. मात्र, चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय मोदींनी यासंदर्भात ठोस पावलेही उचललेली नाहीत. त्यामुळे आता मोदींनी चीनला 'लाल डोळे' दाखवायची वेळ आली आहे. तुम्ही त्यांना 'लाल डोळे' दाखवा पुर्ण देश तुमच्यासोबत आहे, असे मेहबूब शेख यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे.
दरम्यान, चीनच्या हल्ल्यानंतर कोणतीच भूमिका न घेणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनच्या वस्तूमधील 'खुळखुळा' राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भेट म्हणून पाठवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.