मुंबई - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. कुठल्याही मंत्र्यांनी कार्यपद्धतीवर कुठलेही प्रश्न निर्माण केलेले नाही. सरकार एकजुटीने काम करत असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसह लसीकरण, लॉकडाऊन व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली असून राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. याशिवाय पक्षाचे नेते भेटले की, पवारसाहेब राजकीय परिस्थितीवर मंत्र्यांसोबत चर्चा करत राहतात, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. तसेच या बैठकीत मराठा आरक्षणाचा पेच, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे राज्यापुढे उभे ठाकलेले आर्थिक संकट, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना या विषयांवरही चर्चा झाली.