मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (9 सप्टेंबर) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीतील चर्चेकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी नेते, मंत्र्यांकडून शिवसेनेची तक्रार?
शरद पवार यांनी काल (8 सप्टेंबर) राज्यातील मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार मंत्री तसेच खासदार उपस्थित होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनी शिवसेनेबाबत शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि आमदारांची मतदारसंघातील कामे होत नाहीत, असा सूर काही नेत्यांनी उमटवला. याची दखल घेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही भेट होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होणार?
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. मात्र राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आरक्षण नियमित होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील हिच भूमिका आहे. मात्र काल झालेल्या बैठकीमध्ये निवडणुका जाहीर झाल्यास ओबीसी उमेदवारांच्या जागेवर केवळ ओबीसी उमेदवार दिला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाकडून स्पष्ट केलं होतं. तसेच या मुद्द्यावर शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी देखील आजच्या भेटीदरम्यान चर्चा करणार असल्याची माहिती आहे. निवडणुका जाहीर झाल्यास राज्य सरकरची नेमकी काय भूमिका? या बाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - शरद पवारांची दिशाभूल करणाऱ्या भावना गवळींपासून माझ्या जीवाला धोका - हरीश सारडा