मुंबई - राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सहा जिल्ह्यांना पुराचा फटका बसलेला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागातला दौरा केलाच पाहिजे. कारण त्यांच्या दौऱ्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतो. मात्र इतर नेत्यांनी सध्या पूरग्रस्त भागातील दौरा टाळावा, त्यांच्या दौऱ्यामुळे स्थानिक प्रशासनावर ताण पडत असतो आणि त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होतो, असा टोला शरद पवार यांनी दौरा करणार्या इतर नेत्यांना लगावला आहे. सध्या या सहा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर असून नागरिकांना तत्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळे या भागात जर दौऱ्यासाठी मोठे नेते गेले, तर त्याचा परिणाम मदत कार्यावर होत असतो. म्हणूनच आपण स्वतःही या भागात दौरा करण्यासाठी सध्या जाणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'राज्यपालांनी केंद्राकडून मदत आणावी'
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यानंतर आज राज्यपाल देखील पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. राज्यपाल यांचे केंद्र सरकारचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे दौरा झाल्यानंतर त्यांनी केंद्राची मदत राज्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. तसेच दौरा करण्यासाठी राज्यपालांना ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना ते सोबत घेऊन गेले आहेत, असा चिमटाही शरद पवार यांनी राज्यपालांना काढला आहे. राज्यपाल हे आज पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा दौरा करण्यासाठी निलंबित आमदार आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेल्यामुळे शरद पवारांनी हा चिमटा काढला आहे.
'राज्य सरकारकडून लवकरच मदतीची घोषणा होईल'
राज्यात आलेल्या भीषण पुराचा फटका सहा जिल्ह्यांना बसला आहे. जवळपास पाचशे गाव पुरामुळे बाधित झाली आहेत. या सर्व भागांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरे केले असून राज्य सरकारकडून लवकरच मदतीची घोषणा केली जाईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
'तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गावांचे स्थलांतर'
कोकणावर एकामागून एक नैसर्गिक संकट येत आहेत. तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता पुराचा मोठा फटका कोकणाला बसला आहे. भविष्यात अशा संकटांमुळे जीवित हानी होऊ नये, यासाठी तयारी करावी लागेल. म्हणूनच दरड कोसळून जीवितहानी होईल, अशा गावांचे स्थलांतर करण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अशा गावांचे स्थलांतर लवकरात लवकर केला जाईल, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना मदत
पुरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 5 हजार कुटुंब, रायगड जिल्ह्यातील 5 हजार कुटुंब, सिंधुदुर्गातील 500 कुटुंब, कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार कुटुंब, सातारा जिल्ह्यात 1 हजार कुटुंब तर सांगली जिल्ह्यात 2 हजार कुटुंबांना पुराचा फटका बसलेला आहे. एकूण 16 हजार कुटुंबाचे पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. यासाठी या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची मदत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठवण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 16 हजार घरगुती भांडी, पांघरून पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये दोन अन्न शिजवण्याची भांडी, तवा, भात वाढपे, भाजी वाढपाची पळी, पोळपाट-लाटणे एक सतरंजी, दोन सोलापुरी चादरी असे या किटमध्ये असणार आहे.
हेही वाचा - Video: "वरात निघाली महापुरात" वधू-वराचा पुराच्या पाण्यात बोटीतून गृहप्रवेश