मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीची आमदारांशी बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी व्हावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. त्यानुसार, राज्यपाल आमची विनंती मान्य करतील आणि शिवतीर्थावर सायंकाळी ५ वाजता शपथविधी होईल, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
अजित पवारांविषयी मागच्या काही दिवसांत घडलेल्या सर्व बाबी संपल्या आहेत. अजित पवार शरद पवारांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यांनी भाजपसह सरकार स्थापन करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, ते राष्ट्रवादीचेच होते. ते आमचेच होते. त्यांचीही तशीच भावना होती. ती त्यांनी ट्विटद्वारे व्यक्तही केली होती, असेही पाटील म्हणाले.
मंत्रिमंडळाविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उद्धवजी मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असावे, हे तेच ठरवतील, असेही पाटील यांनी सांगितले.