मुंबई - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीत जेजुरी गडावर श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १३ फेब्रुवारी रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी पहाटेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चौफेर टिका केली आहे.
पडळकरांनी केलेला प्रकार हास्यास्पद- जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले की, आततायीपणा किती करायचा, या मर्यादेचा भंग करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचे. स्थानिक व्यवस्थापनाने ज्यांना निमंत्रित केले आहे. सन्मानाने ज्यांना बोलावले आहे. त्यांच्या हस्ते जे उद्घाटन आहे. त्यावरच लोक विश्वास ठेवतात. आता प्रसिद्धीसाठी काही लोक, काहीही करतात. त्यांच्याबद्दल काय सांगणार? हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे, असे प्रकार करणे केविलवाणे असल्याची टीकाही त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाडांचे पडाळकरांना आव्हान-
आज पहाटे लपून छपून चोर दरवाजाने आत जात चोरासारखे गोपीचंद पडाळकर यांनी ज्या माऊलीने स्वकष्टाने संपूर्ण भारतात आपले नाव कोरले. तिच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. अखंड भारतामध्ये सर्वाधिक देवळांचा जिर्णोद्धार कोणी केला असेल तर तो या माऊलीने केला. जी माऊली कधीच कुठल्याही राजवटीला घाबरली नाही आणि स्वत:च्या माध्यमातून एक संस्कारक्षम रयत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. ज्या पद्धतीने गोपीचंद पडाळकर हे शरद पवारांवर बोलले. ही संस्कृती त्या माऊलींची नव्हे. कुठल्याही दुसर्या धर्माचा या माऊलीने उपमर्द केला आहे, असे कुठेही दिसलेले नाही. मला वाटते, गोपीचंद पडळकर यांना एक कला उमगलेली दिसते. शरद पवारांवर टीका केली तर सकाळची हेडलाईन तुमच्या नावावर असते. अरे हिम्मंत होती तर अनावरण दुपारी करायचे, सांगून करायचे, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांना दिले आहे.
आडवे येऊन दाखवा-
उद्या शरद पवार जाणार आहेत. हिम्मत असेल तर आडवा येऊन दाखव, परत उभा राहशील की नाही शंका आहे! अन् येऊ नकोस, तुझ्या भल्यासाठी सांगतोय, अरे तुरेची भाषा ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. ज्या माऊलीने या महाराष्ट्राला दिलेली नाही. त्या माऊलीचे नाव घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करु नका, असेही आव्हाड यांनी सांगितले आहे.
प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊन पट्ट्याचे डिपॉझिट जप्त होत- अजित पवार
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्या टीकेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला आहे. हे विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेलं आहे ज्याची डिपॉझिट कोणी ठेवत नाही त्याची तुम्ही काय एवढी दखल घेता. प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊन पट्ट्याचे डिपॉझिट जप्त होत आहे आणि तुम्ही पत्रकार परिषदेत मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहात, लोकांनीच त्याला नाकारलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला फार महत्त्व द्यायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली.
पडळकरांकडून शासकीय आदेशाचे उल्लंघन
शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे असल्याचे यावेळी पडळकर म्हणाले. दरम्यान, पडळकर यांनी अनधिकृतपणे जमाव जमवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले तसेच बेकायदेशीरपणे पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत त्यांना या ठिकाणावरून बाजूला केले असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येत आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तर अनावरण सोहळा ठरलेल्या वेळेतच ठरलेल्या ठिकाणी शरद पवार यांच्या हस्तेच संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.