मुंबई - दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची आज पुन्हा एकदा मनधरणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आला. मात्र, या प्रयत्नाला पुन्हा एकदा अपयश आल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - असंतुष्ट आमदारांचे समाधान करण्यासाठीच राज्यपालांना पत्र देण्याचे नाटक- अशिष शेलार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात येऊन आपल्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मात्र, त्यासोबत अजित पवार मात्र आपला पदभार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्याच दरम्यान ते विधानभवन परिसरात होते. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विधानभवन परिसरात असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक झाली. मात्र, या बैठकीत अजित पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.
अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ ही बैठक विधानभवनातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनाच्या बाजूला असलेल्या एका केबिनमध्ये सुरू होती. या बैठकीदरम्यान अजित पवार यांची काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही भेट दिली. मात्र, त्यानंतरही निश्चित असा तोडगा निघाला नसल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आज राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्राची एक प्रत विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत(कार्यभार) यांना देण्यात आली. त्यानंतर याची एक प्रत विधानसभा अध्यक्ष सचिव यांच्याकडे देण्यात आली. या पत्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांच्या सह्यांचे निवेदन आणि त्यासोबतच दोन्ही पक्षांचे गटनेते कोण आहेत, याची माहिती यात देण्यात आली आहे. यासाठी शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीकडून शिवाजी गर्जे यांनी सचिवांची भेट घेतली.