मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत चर्चा केली आहे. एनसीबीकडून कशाप्रकारे खोट्या तक्रारी दाखल करण्यात येतात आणि त्या खोट्या तक्रारी दाखल केल्यानंतर खंडणी वसूल केली जाते. याबाबत नवाब मलिक सातत्याने आरोप करत आहेत. या आरोपांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत नवाब मलिक यांनी चर्चा केली असून याबाबत लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. एनसीबीची कारवाई आणि विभागीय आयुक्त यांच्या कारभारावर आपण प्रश्न उपस्थित केले होते. कार्डिया क्रूजवर एनसीबीने कारवाई केली. या कारवाईत पंच असलेल्या प्रभाकर साईलने एनसीबीवर 25 कोटी रुपये खंडणी मागितली असल्याचा आरोप केल्याने नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपात अजूनच भर पडली आहे. त्यामुळे या प्रकरणात एसआयटीद्वारे चौकशी केली जावी, अशी मागणी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर खंडणी गोळा करणे, कारवाईतील पंच फरार होणे, या सर्व गोष्टी बाहेर येतील असे नवाब मलिक यांनी माहिती दिली. मात्र एफआयआर कोणत्याही व्यक्ती विरोधात दाखल न होता, संबंधित घटनेवर एफआयआर दाखल होईल, असेही यावेळी नवाब मलिक म्हणाले.
'बॉलीवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न'
बॉलिवूडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होतात. देशाच्या जीडीपीमध्ये जवळपास तीन ते चार टक्के वाटा बॉलिवूडचा आहे. लाखो लोकांना रोजगार बॉलीवुडमुळे मिळाला आहे. मात्र या बॉलिवुडला जाणून-बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलीवूड बदनाम झाले तर त्याचा परिणाम हा पूर्ण देशावर पडतो आणि देशाची ही बदनामी होते. केवळ खोट्या तक्रारीच्या आधारावर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची काही दिवसापूर्वी चौकशी करण्यात आली. केवळ बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी तपास यंत्रणेचा उपयोग केला जात असल्याचा आरोपही यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे.
मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधानांना पत्र
ड्रग्स संदर्भात काही खोट्या केसेस दाखल करून बॉलीवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री यासंदर्भात पत्र लिहिणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. तसेच कारवाई करत असताना ज्या व्यक्तींनी खरंच गुन्हा केला आहे. त्यांच्याविरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे. मात्र विनाकारण ज्याप्रकारे सेलिब्रिटींना अडकवलं जाते याबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असल्याचे यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले.
हेही वाचा - मलिकांनी "ते" निनावी पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले