मुंबई- केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपातीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णयदेखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात बुधवारी रात्री कपात केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात मागे घेत यू-टर्न घेऊन सारवासारव केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्रसरकारने थट्टा केल्याचा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा-छोट्या बचत योजनांबाबत केंद्र सरकारने केले 'एप्रिल फूल'; व्याजदर कमी करण्याचा आदेश मागे
सरकारने काय काढले होते आदेश?
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याज वार्षिक ४ वरून ३.५ टक्के केले आहे. एक वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ५.५ वरून ४.४ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज ७.४ वरून ६.५ टक्के केले आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ वरून ५.९ टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के करण्यात आले. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी केले आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (१ एप्रिल ते ३० जून २०२१) हे नवे व्याजदर लागू राहतील. मात्र नजरचुकीने झाले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-तुम्ही सर्कस चालवित आहात की सरकार? काँग्रेसचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना टोला
व्याजदर राहणार 'जैसे थे'
केंद्र सरकारने बुधवारी अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी करण्यात आल्याचा आदेश जारी केला होता. मात्र हा आदेश चुकून जारी करण्यात आला आहे. तो लवकरात लवकर मागे घेण्यात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' राहणार असल्याचेही सीतारामन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-केंद्राकडून अल्पबचत योजनांमध्ये व्याजदरात 1.1 टक्क्यांपर्यंत कपात; जाणून घ्या सविस्तर माहिती