मुंबई - राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी घड्याळ काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
आज सकाळी नार्वेकर व सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत त्यांनी राजिनामा दिला. त्यानंतर त्यांनी लगेच शिवबंधन बांधले. ही शिवबंधनाची विप भविष्यात अजून अतूट रहावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.
औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेतच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे बाहेरगावी असल्याने आज पक्ष प्रवेश केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्थापनेपासून वाढवला राष्ट्रवादी पक्ष
मोदी लाटेत मी एकटा निवडून आलो. मात्र, तेथे काम करत असताना दुर्दैवाने कार्यकर्ते व माझी घुसमट, कुचंबणा होत राहिली. हे लोण घरापर्यंत येऊन पोहोचले. त्यानंतरही इतके दिवस संयम राखला होता, मात्र डोक्यावरून पाणी गेल्यावर शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. तो योग आता जुळून आल्याचे ते म्हणाले. शिवसेना पक्ष हा जात पात न बघणारा असल्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याचेही ते म्हणाले.
मराठवाड्यातच नव्हे, तर राज्यात पक्ष वाढविण्यासाठी हातभार लावणार असल्याचा शब्द क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना पक्ष प्रवेशावेळी दिला.