मुंबई - महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याच्या ( Phone Tapping Case ) आरोपावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS officer Rashmi Shukla ) त्यांच्यावर कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात रश्मी शुक्ला यांची 2 वेळा चौकशी देखील झाली होती. या प्रकरणांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( NCP leader Eknath Khadse ) यांची आज (गुरुवार) कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये दोन तास जवाब नोंदवण्यात आली आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात दोन तास खडसेंचा जबाब नोंदवला - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्या प्रकरणात मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातच आज एकनाथ खडसे यांची कुलाबा पोलीस स्टेशनकडून चौकशी करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात पीडित म्हणून बुधवारी (दि.6) रोजी एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आज चौकशीसाठी बोलावले होते. खडसे चौकशीसाठी आज उपस्थित झाले असता, तब्बल 2 तास एकनाथ खडसे यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
दोनदा फोन टॅप झालेला आरोप - एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर झाला आहे. खडसे यांच्याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोनही टॅप करण्यात आला होता. त्यामुळे हा संपूर्ण तपास सुरू आहे. हे फोन टॅपिंग महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी घडले होते. दोन्ही नेत्यांचे फोन दोनदा टॅप झाल्याचा आरोप आहे. तेव्हा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख होत्या.
काय आहे प्रकरण - राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल आहे. अप्पर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पीएस येथे गुन्हा दाखल आहे.