मुंबई - पाणी बील थकल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला महापालिकेने दिवाळखोर म्हणून घोषित केले. या मुद्यावरुन विधानसभेत आज चांगलीच घमासान झाली. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चांगलेच भडकले. अधिकारी झोपा काढतात का, असा संतप्त सवाल पवार यांनी विधानसभेत केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुमासदार उत्तर दिले. आम्ही अंघोळ केल्याशिवाय सभागृहात येणार नाही. आम्हाला अंघोळ करु द्या असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले, की अलिकडच्या काळात माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन सिलेक्टीव्ह पद्धतीने बातम्या दिल्या जातात. पाणी बीलं दुबार आली होती. ती दुरुस्त करुन भरण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
'आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शनचा निर्णय फेरविचार करा'
आणीबाणीच्या काळात शिक्षा भोगलेल्यांना पेंशन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली.
मिसा आणि डीआयआर अंतर्गत ३२६४ लोकांना पेन्शन मंजूर केली. ११७९ जणांना शपथपत्र घेऊन पेन्शन दिली. ६५ कोटींची आर्थिक तरतूद यासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा पातळीवर समिती गठित केली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन करा, अशी मागणी आमदार पराग अळवणी यांनी केली.
आणीबाणीत शिवसेनेने काँग्रेसला मदत केली होती. अजित पवारांच्या सरकारने माझ्या वडिलांना कारागृहात टाकल्याचा आरोप आमदार बदामराव पंडित यांनी केला. यावर आणीबाणीत मी १६ वर्षाचा होतो. एन. डी. पाटील माझे मामा जेलमध्ये होते. तेव्हा आमचे सरकार नव्हते असा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला.
ठाणे जिल्ह्यातील ४७०४ धोकादायक इमारतींबाबतच्या तारांकीत प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी उत्तर दिले. धोकादायक इमारतींचे लेखापरीक्षण करण्यात येईल. अपवादात्मक परिस्थितीत ८ हजार स्वेअर फुटापर्यंत क्लस्टरचा नियम शिथिल करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.