मुंबई - पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. 27 तारखेपासून सुरू होणाऱ्या निवडणुका आठ टप्प्यांत पश्चिम बंगालमध्ये होणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस हा सत्तेत आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाची केंद्रीय टीम पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी तळ ठोकून आहे. तिथेच ममता बॅनर्जींचा प्रचार करण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पश्चिम बंगालला जाणार आहेत.
हेही वाचा - शरद पवार १ एप्रिलपासून उतरणार पश्चिम बंगालच्या रणांगणात
स्टार प्रचारकांच्या यादीत
१ एप्रिल ते ३ एप्रिल असा शरद पवारांचा हा प्रचारदौरा असणार आहे. तृणमूल काँग्रेसने याआधीच आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत शरद पवार यांचे नाव समाविष्ट केले होते. भाजपाचा या निवडणुकीत पराभव करण्यासाठी एकत्र येऊन प्रचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.
कसा असणार शरद पवार यांचा दौरा?
1. एप्रिलला मुंबईतून निघणार, पोहोचल्यानंतर काही मतदारसंघात तृणमूल काँग्रेस उमेदवारांच्या रॅलीत सहभागी होणार
२. एप्रिलला तृणमूलच्या नेत्यांशी चर्चा आणि पत्रकार परिषद
३. एप्रिलला तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बनर्जी सोबत रॅली.
हेही वाचा - शरद पवार यांना सोलापूर विद्यापीठाची डी-लिट पदवी जाहीर
शरद पवार यांच्या प्रचाराला काँग्रेसचा विरोध
शरद पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये घेऊन तृणमूल काँग्रेसचा प्रचार करू नये, अशा प्रकारचा मतप्रवाह पश्चिम बंगालमधील काही काँग्रेस नेत्यांचा आहे. यासंदर्भात पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांना पत्रही लिहिले होते. मात्र पश्चिम बंगाल येथे भाजपाच्या विरोधात ममतांशिवाय कोणताही पर्याय नाही आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले आहे.