मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ( Legislative Council Election ) महा विकास आघाडीकडून सहा उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे दोन आमदार त्यांच्या मतांवर निवडून येत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि काँग्रेसला ( Congress ) आपले दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यासाठीच आपण आणि काँग्रेसकडून शिवसेनेसोबत ( Shivsena ) असलेल्या अपक्ष आमदारांना संपर्क करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना माहिती दिली - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत असलेल्या अपक्ष आमदारांना संपर्क करण्यात आला आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर अपक्ष आमदारांच्या राहणाऱ्या मतांसाठी हा संपर्क करण्यात आला होता. आता सध्या तीनही पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी व्यवस्था करत आहेत. मात्र अंतिम क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांसोबत बैठक घेऊन उमेदवारांच्या मतांच्या कोट्याबाबत आढावा घेणार आहेत. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराचा कोटा ठरवून त्याबाबत मतदान करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रदेशकार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
त्या दोन मतांमुळे राष्ट्रवादीसमोर प्रश्न - राज्यसभेच्या निवडणुकीवेळी तीनही पक्षाचा एक एक उमेदवार निवडून येऊन तिन्ही पक्षाकडे काही मते शिल्लक राहत होती. मात्र यावेळी प्रत्येक पक्षाकडे आपापल्या मतांचा कोटा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना न्यायालयाने मतदान करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अजून मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने मत जमा करत आहेत. त्यामुळे संयुक्त बैठक अद्याप झालेली नाही. मात्र अंतिम वेळी महा विकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संयुक्त बैठक करतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
मतांचा कोटा वाढवावा लागणार - सध्या प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 26 मतांचा कोटा आहे. मात्र, नुकतीच झालेली राज्यसभा निवडणूक लक्षात घेता केवळ 26 मताचा कोटा चालणार नाही. त्यापेक्षा अधिक मतांचा कोटा ठेवावा लागणार आहे. तसेच क्रमांक एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ दहा असे पसंतीक्रम सर्व आमदारांना द्यावे लागणार आहेत. शिवसेनेचे दोन उमेदवार त्यांचे व्यवस्थितपणे निवडून येतील एवढी संख्या त्यांच्याकडे आहे. तसेच या शिवाय मंत्री शंकरराव गडाख, मंत्री राजेंद्र यड्रावकर आणि मंत्री बच्चू कडू यांचीही मते ही शिवसेनेकडे आहेत. 20 तारखेला मतदान करताना कसं मतदान करायचं, आकडा कुठे टाकायचा, एक दोन आकडे दिल्यानंतर तीन, चार आकडे हे कुणात्या उमेदवाराला द्यायचे? यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयंतराव पाटील, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात असे सगळे मिळून त्या बाबतीतला निर्णय घेतील. महा विकास आघाडीची एकजुट असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
अग्निपथ योजने विरोधात तरुणांमध्ये रोष - अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. काही राज्यात हिंसक वळण लागून खूप मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे. शेवटी हा रोष कुठेतरी थांबला पाहिजे. महाराष्ट्रातल्या तरुण सहकाऱ्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे की, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हा लोकांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची खबरदारी आम्ही सगळेजण घेऊ, पण राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणं आपल्या सगळ्यांच्या हिताचे अजिबात नाही. देशाचं नुकसान होतंय. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होतंय याची नोंद सर्वांनी घ्यावी. आज नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महागाईच्या काळामध्ये तर प्रत्येकाला वाटतं किंवा आपल्याला संधी मिळाली पाहिजे, अशी आशा प्रत्येक तरुणाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची सायंकाळी बैठक - आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि मंत्र्यांची हॉटेल ट्रायडंट येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला अद्याप केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन आलेला नाही किंवा अद्याप कोणत्याही आमदाराने अशा प्रकारची तक्रार केलेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणेकडून फोन आला असल्याचा आरोप केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अशा प्रकारचा फोन आला नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
आमदाराला मानसन्मान देऊन त्यांचं मत मागावं - अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांची मते मागताना त्यांचा सन्मान राखून मतं मागितली गेली पाहिजे. अपक्ष आमदार जवळपास पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत. लोकशाहीमध्ये शेवटी अशाप्रकारे आरोप-प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही. ज्या वेळेस आम्ही सगळेजण त्या पक्षांशी संपर्क साधून कसं ते मत आपल्याला घेता येईल याबाबत चर्चा करत असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.
बहुजन विकास आघाडीशी सर्व पक्षांनी संपर्क केला - बहुजन विकास आघाडीची मतं आपल्याला मिळावी यासाठी सर्वच पक्षांनी त्यांच्यासोबत संपर्क केला आहे. त्यांच्याकडे असलेल्या तीन मतांपैकी क्षितिज ठाकूर हे सध्या विदेशवारी करत असून मतदानाच्या दिवशी हजर राहतील का? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. मात्र, बहुजन विकास आघाडीची उर्वरित दोन मते आपल्याला मिळावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील संपर्क केला गेला असल्याचं अजित पवारांनी सांगितले.
हेही वाचा - MLC Election 2022 : मतफुटीच्या भीतीने सेना आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम