मुंबई - मुंबई पोलिसांचे दोन कर्मचारी साध्या वेशात पाठलाग करत असल्याची तक्रार एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी केल्याचे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी मुंबई पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे याविषयीची तक्रार केली आहे.
2 पोलीस मागावर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडेंच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले असून तेव्हापासून ते नेहमी स्मशानभूमीला भेट देत असतात. त्या स्मशानभूमीत ओशिवरा पोलिसातील 2 कर्मचारी गेल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच या अधिकाऱ्यांनी वानखेडेंच्या हालचालींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीसोबत एक सीसीटीव्ही फुटेजही जोडल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, आता या तक्रारीवर मुंबई पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री
कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या पार्टीवर एनसीबीच्या धाडीनंतर या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात क्रुझवर मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी दिसून आली. याशिवाय अनेकजण मास्क न घालता नृत्य करत असल्याचे दिसून आले. सध्या राज्यात कोव्हिड-19मुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यामुळे कलम 188चे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आहे. याशिवाय क्रूझवर पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. मुंबई पोलिसांना परवानगीसाठी कोणतेही लेखी पत्र किंवा क्रूझवरील पार्टीबद्दल मुंबई पोलिसांना कोणतीही सूचना दिलेली नव्हती. या पार्टीसाठी यलो गेट पोलीस ठाण्याची परवानगी घेणे गरजेचे होते. कारण जिथे पार्टी सुरू होती, तो परिसर यलो गेट पोलीस ठाण्याचा कार्यक्षेत्रात येते. मात्र, कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही किंवा कोणतीही सूचना दिल्या नाही. यामुळे आता मुंबई पोलिसांच्या पोर्ट झोन पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्याप्रमाणे पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यावरून कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे मुंबई पोलीस त्यानुसार कारवाई करतील असे सांगितले जात होते.
हेही वाचा - आर्यन खान ड्रग केस प्रकरणातील एनसीबीचा मुख्य साक्षीदार एका गुन्ह्यात फरारी