मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे. यावेळी, त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यही कार्यालयापर्यंत गेले म्हणून, "त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र, त्या टीकाकारांनी आपल्या घरात काय चाललंय याकडे लक्ष द्यावे" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना टोला लगावला आहे.
नवाब मलिक म्हणाले की, ज्यांचे कुटुंब एकसंघ असते अशा कुटुंबांमध्ये कुटुंब प्रमुखाला अडचण आली, तर संपूर्ण कुटुंब त्यांना आधार देण्यासाठी त्याच्या पाठीमागे असते. त्यामुळे, राज ठाकरे यांचे कुटुंबीय किंवा कुटुंबातील लोक ईडीच्या कार्यालयापर्यंत गेले असतील तर त्यावर टीका करणे हे चुकीचे असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
अंजली दमानिया यांनी, राज ठाकरे चौकशीला जात आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी टीका केली होती. त्यामुळे, दमानिया यांनी इतरांची कुटुंबे बघण्यापेक्षा, स्वतःच्या कुटुंबातील लोक काय करतात, त्यांच्यावर पण याप्रकारे काही संकट येणार आहे का? असे म्हणत नवाब मलिक यांनी दमानियांवर टीका केली.
तसेच, या सरकारच्या इशाऱ्यावर त्यांनी या प्रकारचे वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे काय, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचा टोलादेखील नवाब मलिक यांनी लगावला.