मुंबई - राज्यपालांनी गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरे झाले असते, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. अर्णव यांच्याबाबत राज्यपालांनी सहानुभूती व्यक्त केल्यानंतर मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका आरोपीची बाजू घेणे योग्य नसल्याचेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अर्णव गोस्वामीला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपालांचे हे वागणे बरे नव्हे-
प्रत्येक तुरुंगामध्ये असणाऱ्या कैद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. तुरुंगामधील कैद्याला नातेवाईकांना भेटण्यासही परवानगी दिली जात असते. परंतु ज्यापध्दतीने राज्यपाल एक विशेष कैदी असलेल्या अर्णव गोस्वामीला सहानुभूती दाखवतात. नाईक कुटुंब बरेच महिने न्यायासाठी भटकत होते त्यांची बाजू न घेता एका आरोपीची घेणे हे योग्य नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
भाजपकडूनही अर्णवची पाठराखण-
गोस्वामीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन आज नाकारला आहे. त्यानंतर भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे अर्णवला आता सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळेल, असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे. राज्यपालांनी अर्णव यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केल्याने राज्यपालांच्या विरोधात पडसाद उमटले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविला होता. तेव्हा पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणात रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांना अटक केली आहे. तर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्यावर योग्य तपास केला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरेश वराडे यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.