मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय, याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा. ही सीबीआयची जबाबदारी आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून यावर नवाब मलिक यांनी सीबीआयला आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत तर सोशल मीडियावर तो अहवाल पीडीएफमध्ये व्हायरल होत आहे. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट आहे, याचा खुलासा करण्याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
या देशात खोट्या बातम्यांचा व्हायरससारखा फैलाव होत आहे. शासनकर्ते सगळी सत्य माहिती देत नाहीत ती मिडियाने शोधून काढली पाहिजे, ही मीडियाची जबाबदारी असल्याचे देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
नवाब मलिक म्हणाले की, काही वर्तमानपत्रांमध्ये या अहवालाबाबतची बातमी छापून आली आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा हा रिपोर्ट व्हायरल होतोय. आता याबाबत सत्य लोकांसमोर आणणे सीपीआयची जबाबदारी आहे. या अहवालाबाबत सीबीआय सोडून अन्य कुणी खरं की खोटं सांगू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे कागद व्हायरल झालेत लोक यावर विश्वास ठेवतील की नाही माहीत नाही. आता सीबीआयची जबाबदारी आहे की, त्यांनी या बाबतीत खुलासा केला पाहिजे, असे मलिक म्हणाले. ते म्हणाले की, अहवालावर सही आहे नाही आहे हा वेगळा विषय आहे. त्यांच्यावर या आधीसुद्धा आरोप झाले त्यावेळी बिनासहीची कागद फिरत होते आणि त्यानंतर सह्या समोर आला. हे कागद सत्य आहे की असत्य याचा खुलासा आता सीबीआय करू शकते. जर हा अहवाल खोटा असेल तर त्यांच्यावर चौकशी करून यामागे कोण असेल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असं ते म्हणाले.