मुंबई - भाटिया रुग्णालयातील आणखी दहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून रुग्णालयातील एकूण ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. रुग्णालयाला लागून असलेल्या जुनी चिखलवाडी परिसरातील नागरिकांनी हा आरोप केला आहे.
भाटिया रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळेच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; स्थानिकांचा आरोप रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार करण्याची सुविधा नसतानादेखील भाटिया रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू केले. याबाबत कर्मचाऱ्यांनाही कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 70 कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात 25 कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे सामोर आले होते. आता पुन्हा आणखी 10 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35 झाली आहे. चिखलवाडी परिसरात राहणाऱ्या भाटिया रुग्णालयाच्या आणखी तीन कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
रुग्णालयात कोरोनाबाधित दाखल झाल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची दखल घेऊन शासनाने चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीय.