मुंबई - आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवल्याची पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांनी यापूर्वीच आपला राजीनामा द्यायला पाहिजे होता. परंतु ते न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत बसले, अखेर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला. अशी टीका भाजपा नेते नारायण राणे यांनी केली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते, तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. परंतु त्यांनी असे न करता गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. जेव्हा कोर्टाने चौकशीचे आदेश दिले, तेव्हा त्यांनी आपला राजीनामा दिला. या सगळ्या प्रकरणांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का आहेत? मुख्यमंत्री घाबरले आहेत का? मुख्यमंत्री बोलत नाही याचा अर्थ या सगळ्या प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग आहे, असं मी समजतो अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली आहे.
'या सगळ्या प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार'
या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदार आहेत. सचिन वाझे यांना अटक करण्यात देखील मुख्यमंत्र्यांनी अडथळा आणला होता. त्यामुळे हे सरकार जनतेला न्याय देणारे नाही, तर जनतेचे शोषण करणारे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता समजायला हवं की आपण हे सरकार चालवण्यासाठी लायक नाही आहोत, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
'कॉंग्रेसला सरकारमध्ये अस्तित्व नाही'
काँग्रेसला या सरकारमध्ये अस्तित्व नाही, काँग्रेसमधील काही जणांना मंत्रीपद उपभोगायचे आहे, म्हणून त्यांना पक्षाच्या बदनामीचे काही पडलेले नाही. तसेच राज्याचे परिवहन मंत्री हे फक्त कलेक्टर आहेत, गोळा केलेले पैसे ते आपल्याजवळ ठेवणे एवढंच त्यांना जमतं. त्यांची डिग्री देखील बोगस आहे. तसेच त्यांना त्यांच्या डिग्रीचे देखील ज्ञान नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे.
हेही वाचा - ...तर चंद्रकांत पाटील हे फडणवीसांच्या मतदार संघातून निवडणूक लढवतील - मुश्रीफ