मुंबई - एकेकाळी शरद पवार, काँग्रेसवर आरोप करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आज मांडीला मांडी लावून बसल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेकडून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. नारायण राणे हा स्वार्थी, बेईमान आणि पदासाठी लाचारी स्वीकारलेला पहिला माणूस आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल चढवला.
हेही वाचा - MPSC Recruitment : एमपीएससीच्या माध्यमातून राज्यात पंधरा हजार रिक्त पदांची भरती- राज्यमंत्री भरणे
शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर किशोरी पेडणेकर, आमदार तथा शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, अरुण दुधवडकर, अरविंद भोसले उपस्थित होते.
राणेंच्या आरोपांचे शिवसेनेकडून खंडन
केंद्रीय तपास यंत्रणांच्या वाढत्या दबावावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र चढवले. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेकडून या आरोपांचे खंडन करण्यात आले.
स्वतःच्या पक्षाशी ईमान राखला नाही
खासदार राऊत शिवसेनेचे आमचे नेते असून त्यांना भाजप आणि नारायण राणे यांनी ईडीच्या माध्यमातून जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला असला तरी ते कोणत्याही कारणाने डगमगले नाहीत. त्यांनी निधड्या छातीने पत्रकार परिषद घेत घोटाळ्याविषयी सगळे खुलासे केले. मात्र, नारायण राणेंसारखी लाचारी पत्करली नाही, असा दावा विनायक राऊत यांनी केला. राणे यांच्या मागे ईडी लागल्यावर मागल्या दाराने ते भाजपमध्ये सहभागी झाले. स्वतःच्या स्वार्थासाठी नारायण राणे सगळ्या पक्षांमध्ये जाऊन आलेले आहेत. स्वतःच्या पक्षाशी देखील इमान न राखणारा लाचार माणूस आहे, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.
राणेंचा भंडाफोड
जे नारायण राणे भाजप आणि मोदी प्रेमाचे गोडवे गात आहेत, त्यांनी यापूर्वी भाजप असो किंवा आरएसएसवर अक्षरशः खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, असे विनायक राऊत म्हणाले. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विधानांचा भंडाफोड केला.
उद्धव ठाकरे आदर्श मुख्यमंत्री
नारायण राणे लाचारीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असले तरी, कोरोनाच्या काळात संपूर्ण देशवासियांनी उद्धव ठाकरे यांना आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव केला आहे. यशस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना होत असल्याने नारायण राणे आक्रस्ताळपणामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याचे विनायक राऊत म्हणाले.
शंभरच्यावर बोगस कंपन्या
नारायण राणे ज्यांच्या बरोबरीने आज आमच्यावर टीका करत आहेत. त्या किरीट सोमैयांनी आदरणीय राणे यांच्या विरोधात आरोपांची मालिका चालवली होती. त्यावेळी नारायण राणेंच्या पत्नीच्या नावे असणारी हॉटेल्स, मायनिंग आणि जमीन व्यवहाराबाबत अनेक घोटाळ्याच्या टीका करत राणे यांच्यावर शंभर बोगस कंपन्या तयार केल्याचा आरोप केला होता, असे विनायक राऊत म्हणाले.
बेइमानीला धडा शिकवण्यासाठीच महाविकास आघाडीत
एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप करणारी शिवसेना आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा नारायण राणे यांनी उल्लेख केला. विनायक राऊत यांनी या सगळ्या गोष्टी पूर्वी झालेल्या आम्ही नाकारत नाही. मात्र, ज्यांच्या रक्तात बेईमानी आहे, त्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सामील झाले आणि मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्याचे विनायक राऊत म्हणाले.
हेही वाचा - Cabinet Meeting Decision : अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; वाचा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय