मुंबई - संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांना घाम का फुटत होता, असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका ( Narayan Rane Critics on Sanjay Raut ) केली. प्रविण राऊत यांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर त्यांचा थयथयाट सुरू झाला आहे. ते फक्त आरोप करत आहेत, त्यांच्याकडे पुरावे आहेत का, असेल तर त्यांनी ती द्यावीत, असेही राणे म्हणाले. मुंबईतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत ( Narayan Rane Press Conference ) होते.
उद्धव ठाकरेच्या खुर्चीवर संजय राऊत यांचे लक्ष्य - संजय राऊत यांचे लक्ष्य उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. शिवसेना संपविण्याची संजय राऊत यांना सुपारी मिळालीआहे, अशी टीका राणेंनी केली. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे, वेळ आल्यास कुंडली समोर आणू, असा इशाराही नारायण राणेंनी केला.
बाळासाहेबांच्या विरोधात लिहिणारे आज त्यांचा आशीर्वाद म्हणतात - संजय राऊत पत्रकार असताना त्यांनी एका वृत्तपत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लिहीले होते. आता शिवसेनेतून पद मिळाल्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद असल्याचे म्हणतात, अशी टीका करत राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी लवकरच राऊत यांच्याकडे लक्ष द्यावे, अन्याथा ते संपूर्ण शिवसेना आपल्या ताब्यात घेतील.
स्वतः अडचणीत असल्याने राऊत यांनी घेतली पत्रकार परिषद - ईडीकडून चौकशी सुरू आहे. प्रवीण राऊत यांची ईडीने चौकशी केली आहे. त्यामुळे ते संजय राऊत अस्वस्थ झाले आहेत. स्वतः अडचणीत सापडल्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोलाही राणे यांनी लगावला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी गप्प बसू नये - संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची वसुली केली, असे आरोप केले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना आपल्या कार्यालयात घेऊन जावे व कोट्यवधींची वसुली कोठून केली याबाबत चौकशी करावी, असे नारायण राणे म्हणाले.
महाविकास आघाडीत राज्याच्या दरडोई उत्पन्नात घट - महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर 2019-2020 मध्ये 2 लाख 2 हजार 130 दरडोई उत्पन्न होते ते आज 1 लाख 88 हजार 784 इतके खाली आले आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागल्याचे सर्व वाभाडे पुराव्यासह काढेन - राज्य सरकार भाजप कार्यकर्त्यांच्या मागे लागत आहे. सतत भाजप कार्यकर्त्यांच्या मागे लागल्याचे सरकार व सेनेचे सर्व वाभाडे पुराव्यासह बाहेर काढेन, असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी दिली. मी केंद्रीय मंत्री आहे, पुराव्यासह केंद्रीय यंत्रणेकडे चौकशीची मागणी करावी लागेल त्यानंतर सर्वांची मग पळता भुई थोडी होईल, असेही म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादीवर सडकून टीका करणारे आज मांडीला मांडी लावून बसले - पूर्वी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे व संजय राऊत हे काँग्रेस व राष्ट्रवादीवर सडकून टीका करत होते. मात्र, सत्तेच्या लाचारीसाठी त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली.
साहेबांचे अन् उद्धव ठाकरेंचे मी कपडे उतरवीन, असे राऊत म्हणाले होते - मला पद दिले नाही तर पाहून घेईन, साहेबांचे अन् उद्धव ठाकरे यांचे मी कपडे उतरवी, असे हे संजय राऊत एकदा बोलले होते. याचा साक्षीदार माझ्याकडे आहे. गरज असल्यास तेव्हा समोर आणतो. माझ्यासमोर साहेबांबद्दल बोलला असता तर तिथेच आडवा केला असता. आता पदे मिळालीत म्हणून हे पैसे कमवायला आले आहेत. संजय राऊत हे पगारी नेता आहेत, सामनामध्ये काम करतात, अशी टीकाही राणे यांनी केली.