मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना दिशा सालियानच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी चौकशी करण्याकरिता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, नारायण राणे यांनी चौकशीला उपस्थित राहण्याकरिता अधिक वेळ मागून घेतला आहे. त्यानंतर आता नारायण राणे आणि नितेश राणे हे उद्या दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हेही वाचा - Prakash Ambedkar On OBC Reservation : सरकारने ओबीसी आरक्षणाचं खोबरं करायचं ठरवलंय; प्रकाश आंबेडकरांची टीका
दिशा सालियानची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी, अशी विनंती सालियान कुटुंबीयांनी वारंवार केल्यानंतरही केंद्रीय लघू मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे हे या प्रकरणाचा आधार घेत सातत्याने टीका करत होते. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ती गरोदर होती असा नारायण राणेंचा दावा आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे, आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियान कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून, मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता सालियान कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता.
हेही वाचा - Nagraj Manjule on Jhund : अमिताभ बच्चन यांच्यामुळे झुंड हिंदीत -नागराज मंजूळे