मुंबई - भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. (Congress on Mamata Banerjee ) हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले (Congress on Mamata Banerjee) म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुलजी मोदी सरकारविरोधात लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन पक्षांना भाजपविरोधात लढता येणार नाही -
भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.
तसेच राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांवर या दरम्यान भाजप आणि इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुलजी गांधी मागे हटले नाहीत. देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात? असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले
गेली सात वर्ष काँग्रेस भाजप नीतीच्या विरोधात -
देशात मोदी सरकार आल्यापासून मेसेज आणि भारतीय जनता पक्षाची नीती राज्यभर राबवली जातेय. त्यांच्या प्रत्येक निधीचा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी कडाडून गेली सात वर्षे विरोध केला आहे. या देही तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस हा एकच पर्याय असल्याचे मत माजी मंत्री नसीम खान यांनी देखील व्यक्त केले.
मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर 'फोडा आणि झोडा'चा प्रयोग -
लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला.
मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर 'फोडा आणि झोडा'चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे.