मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आज फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. २०१६-१७ मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले. यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली.
'देशमुख करू, भुजबळ करु' -
नाना पटोले पुढे म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशाप्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बर्बाद करण्याचे प्रयत्न आहे. सभागृहात अनिल देशमुख करु, भुजबळ करू अशा धमक्या दिला जात आहेत. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उद्याच या प्रकरणी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेऊ, असे वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले.